कुप्रसिध्द गुंड अल्ताफ बेग ऊर्फ अल्ताफ टकल्या (२७) याची डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथील मुशावरात चौकात घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्येच्या कारणाचा उलगडा होऊ शकलेला नाही.
मध्यरात्रीच्या सुमारास अल्ताफ एका फर्निचर दुकानाजवळ उभा होता. त्यावेळी दोन संशयित दुचाकीवरून तेथे आले. अल्ताफच्या डोक्याच्या मागील भागात त्यांनी बंदुकीची गोळी झाडल्यामुळे तो जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. गोळीबाराच्या आवाजाने आजुबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील अल्ताफला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अल्ताफच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घरफोडी आदींचा समावेश आहे. त्याचा भाऊ अश्पाक बेग याच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येचे कारण तसेच संशयित निष्पन्न झाले नसले तरी तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.