प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा / सोलापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांस ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून गरज पडल्यास गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा भ्रमणध्वनी संच मागा, असा अजब आदेश सोलापूर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी ‘लोकसत्ता’ला या अजब आदेशबाबत माहिती दिली.  ते म्हणाले, कोण आपला मोबाइल दुसऱ्याच्या सुपूर्द करेल? शिक्षक संघटनांचा ऑनलाइन शिक्षणास विरोध नाही. मात्र प्रामुख्याने ग्रामीण भागातील पालकांकडे असे मोबाईल आहेत का? इंटरनेट सुविधा, त्यावर खर्च करण्याची तयारी याचाही विचार झाला पाहिजे.  शासन आदेशात  मोबाइलचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याचे नमूद आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक समितीने सावध भूमिका घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे आणि पालक त्याच्याकडे लक्ष देऊन अभ्यास करून घेत असतील, अशाच विद्यार्थ्यांची संख्या प्रशासनास सांगावी, अशी विनंती संघटनेने शिक्षकांना केली आहे. असे न केल्यास मनस्ताप होण्याचा इशाराही  दिला आहे.  याबाबत कोंबे म्हणाले,  ग्रामीण भागात  ऑनलाइन शिक्षण सोयीचे ठरत नसल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. खोटी माहिती देऊन अहवाल तयार करण्याचे प्रकार घडतात. म्हणून शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव मांडावे. दुसरी बाब म्हणजे सरसकट सर्व शाळा बंद करायला नको. ज्या गावात रुग्ण आढळला असेल, त्याच गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला पाहिजे, असेही  कोंबे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर ही प्रयोगांची भूमी आहे. मोबाईल संकलन हाही एक प्रयोगच आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने  बघावे. गावातील प्रतिष्ठित मंडळीकडे  तीन, चार मोबाईल संच असतात. त्यापैकी एक ते विद्यार्थ्यांसाठी देऊ शकतात. पन्नास व्यक्तींना आवाहन केल्यावर दोन जरी मिळाले तरी पुरेसे ठरेल. या आदेशाला शिक्षकांनी अन्यथा घेण्याचे कारण नाही.

– किरण लोहारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सोलापूर.