आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली होती. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यादृष्टीने त्यांनी महाराष्ट्र दौरेही सुरू केली. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी असलेल्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवत असल्याचं राज ठाकरे यांनी आज पाडवा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थवरून जाहीरपणे सांगितलं. तसंच लोकसभेतून काढता पाय घेतला असला तरीही त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी तयार राहण्याचंही आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकल्यानंतर राज ठाकरेंचे दिल्ली दौरे वाढले होते. त्यामुळे राज ठाकरे एनडीएममध्ये सामील होण्याच्या चर्चांना जोर आला होता. त्यातच, राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. यामुळे राज ठाकरे खरंच महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं. जागा वाटपाबाबतही समाज माध्यमांवरून चर्चा सुरू झाली. राज ठाकरेंना लोकसभेसाठी तीन जागा मिळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात? महायुतीत सहभागी होतात की एकला चालो रे ची भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अमित शाहांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे या भेटीची उत्सुकता वाढली होती. राज ठाकरेंची ही भूमिका पाडवा मेळाव्यात जाहीर करणार असं सांगण्यात आलं. त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष होतं. आज त्यांनी त्यांची भूमिका जाहीरपणे मांडली.

हेही वाचा >> MNS Gudi Padwa Melava : अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? राज ठाकरेंनी शिवतीर्थवरून सांगितला घटनाक्रम, म्हणाले….

“फक्त नरेंद्र मोदींसाठी…”

“फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे”, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, “या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे, ज्याच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत, त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहे. पुढच्या भविष्यात मला खंबीर नेतृत्त्वाची गरज असताना मी त्यांना सांगितलं की माझी काही अपेक्षा नाही. मनसे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं मी जाहीरपणे सांगतो. त्यामुळे गावागावातून आलेल्या मनसैनिकांना सांगायचं आहे की विधानसभेच्या तयारीला लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.”

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेणार का? या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “जागावाटपावरही चर्चा झाली. मी खरं सांगू का? मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो ते १९९५ ला. दोन तू घे, ही मला दे.. हे मला जमणार नाही. माझ्याकडून ते होणार नाही” असंही राज ठाकरे म्हणाले.

टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून दिसला

राज ठाकरे पहिला माणूस होता ज्याने म्हटलं होतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यावेळी त्यांच्या पक्षातलंही कुणी याबद्दल बोललं नव्हतं. मी पाठिंबा दिला. २०१९ पर्यंत पाहिलं की ज्या गोष्टी झाल्या त्या मला पटल्या नाहीत. बुलेट ट्रेन, नोटबंदी सगळे निर्णय घेतले. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याचा मी विरोध दर्शवला. ज्या माणसावर सर्वात विश्वास असतो त्यावेळी विचार करत होतो की देशात अनेक गोष्टी घडू शकता. ज्यांच्यावर प्रेम आणि विश्वास असतो त्याला तडा जातोय हे दिसायला लागलं तेव्हा तो जो राग असतो तो राग आला. माझा राग तर टोकाचा आहे. महाराष्ट्रावर माझं प्रेम आहे ते टोकाचं प्रेम आहे. माझा टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून तुम्हाला दिसला. असंही राज ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींकडून मला खूप अपेक्षा आहेत

“नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल, देशात अराजक येईल” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.