शहरातून वाहणारी गोदावरी ही नदी राहिलेली नसून तिचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या परिस्थितीत आगामी सिंहस्थ कुंभमेळा कसा होईल, असा प्रश्न प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी उपस्थित केला. शनिवारी गोदावरी नदीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गोदावरी प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंचने राजेंद्र सिंह यांना गोदावरी नदीची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी राजेंद्र सिंह यांनी मंचच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पाहणी केली. तपोवन परिसरातील पात्रालगतच्या पालिकेच्या मलजल शुद्धीकरण केंद्रालाही भेट दिली. हा दौरा झाल्यावर त्यांनी गोदावरीची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे सांगितले. गोदावरी ही नदी राहिली नसून तिचे नाल्यात रूपांतर झाले आहे. पुढील दोन वर्षांत गोदाकाठी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. हा धार्मिक उत्सव या नाल्यात कसा साजरा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मलजल शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया करून नदीत सोडलेले पाणी फेसाळयुक्त आहे. त्याचा विपरीत परिणाम शेतीवर होईल. अशुद्ध पाणी बाहेर सोडले जात असल्याने या शुद्धीकरण केंद्राचा कोणताही उपयोग नसल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीला प्रदूषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी शहरवासीयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांनी दबावगट निर्माण करून गोदावरी नदीप्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राजेंद्र सिंह यांनी केले.