गावासाठी गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी यशस्वी व्यवस्था निर्माण करण्यात गोंदिया व रायगड या जिल्ह्य़ांनी आघाडी घेतली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सामोपचाराने तंटे मिटविण्यात या जिल्ह्य़ांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
गावपातळीवर दाखल असलेले व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्या अंतर्गत दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर स्वरूपाचे तंटे सामोपचाराने मिटविता येतात. त्याकरिता तंटे मिटविण्याची विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आजवर वेगवेगळ्या स्वरूपाचे १० लाखांहून अधिक तंटे सामोपचाराने मिटविण्यात यश आले. या मोहिमेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त गाव समित्यांची भूमिका या कामात महत्त्वपूर्ण असते. शासनाने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार या प्रक्रियेत तंटामुक्त गाव समित्यांना आवश्यक तिथे पोलीस ठाणेप्रमुख व कर्मचारी, महसूल विभाग, जिल्हा-तालुका विधी सेवा प्राधिकरण, मोफत कायदे सल्लागार समिती आदींचे सहकार्य दिले जाते. पाचव्या वर्षांतील जिल्ह्य़ांची कामगिरी जाहीर झाली नसली तरी तत्पूर्वीचा आढावा घेतल्यास या पद्धतीने तंटे मिटविण्यात चार जिल्हे आघाडीवर राहिल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून लक्षात येते.
२००९-१० या वर्षांत सामोपचाराने तंटे मिटविण्यात गोंदिया ७५.८६ टक्के तंटे मिटवून अग्रस्थानी होता. त्याखालोखाल रायगड जिल्ह्य़ाने स्थान मिळविले. या जिल्ह्य़ाने ६१.७१ टक्के तंटे सामोपचाराने मिटविले. तृतीयस्थानी असणाऱ्या पुणे ग्रामीणच्या हद्दीत सामोपचाराने मिटविलेल्या तंटय़ांचे प्रमाण ५७.०२ टक्के होते. त्यापुढील म्हणजे २०१०-११ या वर्षांत गोंदिया व रायगड जिल्ह्य़ाने सामोपचाराने तंटे मिटविण्यात लक्षणीय कामगिरी करण्याची परंपरा कायम राखली. या वर्षांत प्रथमस्थानी राहणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने मिटविलेल्या तंटय़ांचे प्रमाण ७०.६५ टक्के तर द्वितीयस्थानी असणाऱ्या रायगड जिल्ह्य़ाने मिटविलेल्या तंटय़ांचे प्रमाण ५८.६१ टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने ५०.५९ टक्के सामोपचाराने मिटवून तृतीयस्थान मिळविले.