रवींद्र जुनारकर
समाजामध्ये विवेकनिष्ठ, बुद्धी प्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्यासाठी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने ‘जादूटोणाविरोधी कायद्याचा’ समावेश अभ्यासक्रमात केला आहे. या कायद्याचा समावेश करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
सर्वाधिक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही राज्यात अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या अनेक घटना समोर येतात. अंधश्रद्धेतून छोटय़ा बाळापासून तर मोठय़ांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा तयार करून अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सातत्याने लावून धरली होती. अंधश्रद्धाविरोधी मोहीम राबवतानाच त्यांची निर्घृण हत्या झाली. मात्र, डॉ. दाभोळकरांच्या स्वयंसेवकांनी त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण केले. गोंडवाना विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विधिसभेच्या बैठकीत ‘जादूटोणाविरोधी कायद्याचा’ समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे कार्यकर्ते तथा सिनेट सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर यांनी विधिसभेत हा विषय मांडला व अभ्यासक्रम लागू करण्याची विनंती केली. त्यावर विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेत गोंडवाना विद्यापीठाच्या बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात राज्य सरकारने केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे.
विद्यार्थी अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर कुटुंब, समाजासाठी करू शकतो. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल. अंधश्रद्धेतून आजारावर उपचार न करणे, भोंदूबाबा, बुवाच्या मागे न लागणे, गुप्तधनासाठी घरच्या लहान मुले, स्त्रियांवर अत्याचार, नरबळी सारखे प्रकार या अभ्यासक्रमामुळे दूर होऊ शकतात. आजची परिस्थिती विवेकवाद आणि पुरोगामी विचारांना विरोधी करणारी असताना गोंडवाना विद्यापीठाने अतिशय धाडसाने ‘जादूटोणाविरोधी कायद्याचा’ समावेश अभ्यासक्रमात करण्याचे पाऊल उचलले आहे. याद्वारे गोंडवाना हे राज्यातील पुरोगामी विद्यापीठ म्हणून समोर आले आहे.
चर्चेअंती निर्णय
विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत या कायद्याचा’ समावेश बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात करण्याचा निर्णय झालेला आहे. सविस्तर चर्चेअंतीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
– डॉ.चंद्रशेखर भुसारी, उपकुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली</p>