गेल्या जवळपास महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे महाराष्ट्राच्या काही भागात पुनरागमन झाले असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडतो आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र, या पावसामुळे शेतकऱयांपुढील चिंतेचे वातावरण अद्याप कमी झालेले नाही.
जूनमध्ये कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याचबरोबर विदर्भात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर जुलैमध्ये अधूनमधून हलक्या सरी पडायच्या. संततधार पाऊस या महिन्यात झाला नाही. झारखंड व छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा यासह इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात अद्याप संततधार पावसाला सुरूवात झालेली नाही.