विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एकीकडे गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचे धोरण निश्चित केले असले तरी दुसरीकडे समाजकल्याण विभाग लाखो रुपयांचे पुरस्कार जाहीर करून शालेय शिक्षण विभागाच्या धोरणालाच हरताळ फासत आहे.

उच्च शिक्षणातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे जाहीर कौतुक केले जाते. त्यासाठी सुवर्ण, रौप्यपदके प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येते. अमूक अमूक विद्याशाखेतील ‘गोल्ड मेडॅलिस्ट’ अशी जन्मभर ओळख विद्यार्थी जपत असतो आणि अभिमानाने मित्रमैत्रिणींना सांगत असतो. एवढेच नव्हे, तर विद्यापीठाच्या अनेक विभागांमध्ये अशा गोल्ड मेडॅलिस्ट विद्यार्थ्यांची नावे वर्षांनुवर्षे विभागातील फलकांवर लावून अभिमानाने झळकवले जातात. मात्र, शालेय शिक्षण विभागाची गोष्टच वेगळी. विद्यार्थी आत्महत्या करतात, ही सबब पुढे करून त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये गुणवत्ता यादीच रद्द केल्याने खास करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आली आहे. आश्चर्य म्हणजे, एकीकडे गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचे धोरण, तर दुसरीकडे गुणानुक्रमे पुरस्कार देण्याचे धोरण शासन एकाच वेळी राबवत असल्याने हा सर्वप्रकार हास्यास्पद ठरत आहे.

राज्य शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये राज्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांला समाजकल्याण विभागामार्फत भरघोस पुरस्कार जाहीर केले आहेत.

मात्र, गुणवत्ता यादीविना तो कसा काय दिला जातो, असा प्रश्न काही पालकांनी उपस्थित केला आहे. मागासवर्गीयांमधील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्तांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा भटक्या विमुक्तांसाठी समाजकल्याण विभागाने वेगळा ‘जीआर’ काढून त्यांना वसंतराव नाईक पुरस्कार देण्याचे जाहीर केल्याने त्यांना पुरस्कार कशाच्या आधारावर देणार, असा प्रश्न सोमलवार विद्यालयाची विद्यार्थिनी राजवी आंबुलकर हिचे आजोबा आर.एस.आंबुलकर यांनी उपस्थित करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये राज्य शासनाने पुरस्कारासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता यादी रद्द केली. मग पुरस्कार कशाच्या आधारावर ते देणार आहेत. त्यातल्या त्यात गेल्या वर्षी शासनाने विमुक्त भटक्यांसाठी पुन्हा निर्णय घेतला कसा, असा प्रश्न आंबुलकर यांनी उपस्थित केला आहे.

पुरस्काराची रक्कम वाच्यता न करता खात्यात जमा

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव श्रीराम चव्हाण म्हणाले, शासनाच्या धोरणानुसार आम्हाला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करता येत नाही. मात्र, विभागीय पातळीवर जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय येतात त्यांच्या नावाची वाच्यता न करता त्यांना पुरस्कारासाठी पात्र असल्याचे पत्र पाठवले जाते. तसेच त्यांच्या खात्यात पुरस्काराची रक्कम जमा केली जाते. रामदासपेठेतील सोमलवार महाविद्यालयाची राजवी आंबुलकर या विद्यार्थिनीचे गुण पुनर्मूल्यांकनामध्ये वाढले होते. तिला ९९ टक्के गुण असून विभागातून तिला सर्वात जास्त गुण प्राप्त झालेले आहेत.