या जिल्ह्य़ातील सिंचन क्षेत्रात झपाटय़ाने वाढ व्हावी व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधावा, यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. दहा सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून दीड हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
विदर्भ हा तसा सिंचनाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत पाठीमागेच आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती खुंटलेली आहे. त्यामुळे आस्मानी व सुलतानी फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बारगळून त्यांच्यापुढे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. या खाईतून काढण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करीत आहे. सिंचनाची क्षमता वाढल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधेल यासाठी शासन स्तरावरून पाझर तलाव, साखळी बंधारे, छोटे-मोठे प्रकल्प निर्मिती करणे सुरू आहे. जिल्ह्य़ात ८० पाझर तलावांची कामे सुरू असून त्यापैकी ३८ पाझर तलावांची कामे पूर्ण झाली असून ४२ पाझर तलावांची कामे प्रगती पथावर आहेत. यावर २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या पाझर तलावांच्या माध्यमातून अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. लघूसिंचन विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ातील बुलढाणा, देऊळगावराजा, मेहकर, चिखली व खामगाव या पाच तालुक्यांमध्ये लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे साठवण तलाव व सिंचन तलावांची कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. यात बुलढाणा तालुक्यात दोन प्रकल्पांची कामे सुरू असून दोन्ही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. साडेपाच कोटी रुपये या प्रकल्पांवर खर्च झाले असून या प्रकल्पांच्या माध्यमातून २९८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात एका प्रकल्पाचे काम या विभागामार्फत पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर जवळपास चार कोटी रुपये खर्च झाला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून २०३ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. मेहकर तालुक्यात एका प्रकल्पाचे काम सुरू असून ते प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पावर ३१ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १०७ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. चिखली तालुक्यात तीन प्रकल्पांची कामे सुरू असून ती प्रगतिपथावर आहे. या तीन प्रकल्पांवर ३१ कोटी ४४ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ५३५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. खामगाव तालुक्यात तीन प्रकल्पांची कामे सुरू असून तीनही काम प्रगती पथावर आहेत. या प्रकल्पांवर एक कोटी ८७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यावर ४४५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. असे जिल्ह्य़ात एकूण दहा साठवण व सिंचन तलाव सुरू असून यावर ४३ कोटी रुपये खर्च होणार आहे. यापैकी तीन प्रकल्प पूर्ण झाले असून सात प्रकल्प प्रगती पथावर आहेत.
शेतकऱ्यांना साठवण तलावांमधील उपसिंचन करून सिंचनाच्या सोयी कराव्या लागतात, तर सिंचन तलावातून कालव्यांव्दारे शेतकऱ्यांना पाणी वाटप होत असते. जिल्ह्य़ात सिंचनाच्या सोयी जास्तीत जास्त उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झपाटय़ाने होईल, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येलाही आळा बसेल. जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी आगमी काळात इतर विकासकामांना दुय्यम स्थान देऊन सिंचन क्षमता वाढविण्यासाठी साखळी बांध, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्य़ातील रखडलेले छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हिरिरीने सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. साठवण व सिंचन तलाव आगामी काही महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देशमुख यांनी दिली.