पोलिसांकडून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाचा तपास योग्यप्रकारे सुरू आहे. या तपासात सनातन संस्थेविषयी समोर येणारी माहितीच या संस्थेचे भविष्य ठरवेल. त्यामुळे सरकारकडून कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यासंदर्भात विरोधकांकडून केले जाणारे सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सरकारवर सनातन संस्थेला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांचा हा आरोप निराधार असून ही त्यांची जुनी सवय असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पोलीस दलाने संयमाने व कौशल्याने या प्रकरणी तपास सुरु ठेवला असुन ते अभिनंदनासा प्राप्त आहेत, असेही त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले .