रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परंडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे फुलोऱ्यात आलेली हुरडय़ाची ज्वारी भुईसपाट झाली. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट  झाल्याने भाकरी महागणार आहे.
परंडा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी खरिपाची पिके वाया गेली. रब्बी पिके तरी हाती लागतील, या आशेने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी मोठय़ा प्रमाणावर केली होती. रिपरिप पावसावर ज्वारी चांगली आली. ज्वारी फुलोऱ्यात आली असताना गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे हुरडय़ाची ज्वारी आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या वाटय़ाला दुष्काळात तेरावा आला.
तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खासापुरी, चांदणी, साकत, खंडेश्वरवाडी हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. खासापुरी प्रकल्पात फक्त १० फूट पाणी आले. या धरणातील दोन फूट पाणी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कॅनॉलद्वारे सोडण्यात आले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या ज्वारीला पाणी मिळाले, ती ज्वारीदेखील चांगली आली होती. धरणातील आठ फूट पाणी परंडा शहर व परिसरातील खेडेगावातील नागरिकांना पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावरच शहरासह अनेक खेडेगावांतील नागरिकांची तहान भागणार आहे.
ज्वारीचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेणाऱ्या सिरसाव, वाकडी, भांडगाव, जवळा, कांदलगाव, बावची, अंधुरी, साकत, कुंभेफळ, रोहकल, अनाळा या भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने ज्वारी आडवी झाली आहे.