रत्नागिरीकरांना साहित्य आणि ग्रंथविषयक विविध उपक्रमांची मेजवानी देणारा ‘ग्रंथोत्सव’ येत्या शुक्रवारपासून (१५ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला आहे.
 जिल्हाधिकारी राजीव जाधव आणि जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी आज या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, जिल्हा माहिती कार्यालय, शासकीय विभागीय ग्रंथालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षी हा ग्रंथोत्सव संयुक्तपणे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात (शासकीय विभागीय ग्रंथालय) होणार असून प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची प्रमुख उपस्थिती आहे. उद्घाटनानंतर सकाळी ११ वाजता प्रा. भालेराव यांचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता स्मिता राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय ग्रंथालयात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.
शाळकरी वयापासून मुलांना साहित्य वाचनाची गोडी लावण्याच्या उद्देशाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ग्रंथालयात ‘मला पुस्तक हवे’ या विषयावर बालसभा आयोजित करण्यात आली आहे.  
 शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार असून, सभेचे संयोजन व सूत्रसंचालनही विद्यार्थीच करणार आहेत. या अनोख्या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या वाचनाबद्दलच्या प्रतिक्रिया प्रकट होतील, अशी अपेक्षा आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (१७ फेब्रुवारी) ‘मराठी भाषेचा विकास’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. डॉ. श्रीकृष्ण जोशी याप्रसंगी बीजभाषण करणार असून बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मदन हजेरी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आहेत. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा समारोप होणार आहे.
ग्रंथ प्रदर्शन व विक्री
महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय ग्रंथालयाच्या आवारात तीन दिवस ग्रंथ प्रदर्शन आणि सवलतीच्या दराने विक्री होणार आहे. राज्यातील आघाडीच्या प्रकाशकांच्या ग्रंथांबरोबरच शासकीय प्रकाशनेही प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.
राज्याचे माहिती जनसंपर्क महासंचालनालय आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे या महोत्सवासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.