कडाक्याचे ऊन आणि दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्र पोळून निघत असून, पहिला पाऊस पडेपर्यंत संपूर्ण राज्यातील चाराटंचाईचे संकट आणखी गडद होणार आहे. हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत दुष्काळी भागांतील जनावरांना छावणीत तगवून ठेवण्याचे खडतर आव्हान राज्य सरकारपुढे उभे ठाकले आहे. या स्थितीत भारतीय जैन संघटनेच्या चारा छावण्या म्हणजे वाळवंटातील हिरवळ ठरल्या आहेत. खडतर काळ लक्षात घेऊन संघटतर्फे चारा आयातीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
भारतीय जैन संघटना सध्या राज्यातील ३० छावण्यांमध्ये सुमारे दहा हजार जनावरांचा सांभाळ करीत आहे. या जनावरांना दररोज टनावारी चाऱ्याची गरज भासते. बैलाला ३५ किलो ओला चारा आणि ओली वैरण उपलब्ध नसल्यास सुकी वैरण कडबाकुट्टीच्या रुपात खाऊ घालावी लागते. म्हशींना अन्य जनावरांच्या तुलनेत २० टक्के अधिक वैरण द्यावी लागते. गाई आणि वासरांसाठीचे चाऱ्याचे निकष वेगवेगळे आहेत. शिवाय प्रत्येक जनावराला किमान ५० ते ६० लिटर पाणी एकात दिवसाला लागते. हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांची पाळीव जनावरे या छावण्यांमध्ये आणून बांधली असून, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी जैन संघटना पार पाडत आहे.
पाऊस लांबल्यास चाऱ्याची टंचाई आणखी तीव्र होणार आहे. छावणीत उपलब्ध असलेला चारा एवढाच पर्याय पशुपालकांकडे आहे.  चाराटंचाईमुळे जनावरे पाळणे अत्यंत खर्चीक झाले असून, साडेतीन रुपये किलोप्रमाणे मिळणारी कडबाकुट्टी आता सव्वासात रुपये या दराने विकत घ्यावी लागते. शिवाय चाऱ्याची ट्रकने वाहतूक करण्यासाठी लागणारे गाडीभाडे १० हजार रुपयांपेक्षा कमी नाही. मे महिन्याच्या अखेरीस चारा टंचाईचे स्वरूप अत्यंत भीषण आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्याच्या काळासाठी कोणता आणि किती चारा मिळू शकेल, याचे आडाखे सरकारला बांधावे लागणार असून, निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास शेतकऱ्यांचे पशुधन गंभीर संकटात सापडणार आहे.
भारतीय जैन संघटनेच्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये चारा सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध होतो. या पाच राज्यांपैकी मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या अगदी जवळ असल्याने तेथून चारा आणण्यात आल्या. मध्य प्रदेशातील बिना येथे चण्याचा भुसा मुबलक प्रमाणात विकला जातो. भुसा जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक खाद्य आहे. येथून चाचणीदाखल तीन ट्रक चण्याचा भुसा आयात करून प्रयोगशाळेत तपासण्यात आला. प्रयोगशाळेतून हिरवा कंदील मिळाल्यानंतर औरंगाबाद, बीड, जालना या टंचाईग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले. परंतु, बिना येथील कडबा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापाऱ्याने अचानक चाऱ्याचा दर दीडपट वाढविल्याने मोठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छोटय़ा व्यावसायिकांशी संपर्क साधून सातशे टन चारा गोळा केला आणि २५ हजार पोत्यांमध्ये भरून रेल्वेच्या ४१ वाघिणींद्वारा दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पाठविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे चण्याचा भुसा आणि हरयाणातील गव्हाचा भुसा आणण्याच्या हालचाली संघटनेने सुरू केल्या आहेत.
जनावरांच्या उपासमारीचा धोका
आगामी १५ दिवसांत पुरेसा चारा उपलब्ध न झाल्यास छावणीतील पाळीव जनावरांवर उपासमारीची पाळी येणार असल्याचा इशारा ज्येष्ठ पशू अभ्यासक शांतिलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य महेंद्रकुमार कटारिया यांनी दिला आहे.