नरेंद्र मोदी यांनी गुजरातला विकासात आघाडीवर नेले, मात्र देशाचा कृषिमंत्री महाराष्ट्राचा असूनही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या राज्यात होतात, ही खेदाची बाब असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली.
शेतकरी व युवकांच्या प्रश्नांबाबत भाजप संवेदनशील असून देश चालवण्यास भाजप आघाडी सक्षम उभी आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील गायकवाड यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. गायकवाड यांच्या प्रचारार्थ निलंगा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार सुधाकर भालेराव, रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. गोपाळराव पाटील, उमेदवार गायकवाड, भाजप प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर, टी. पी. कांबळे यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यानंतर सुमारे ५५ वष्रे काँग्रेसची सत्ता असतानाही मूलभूत प्रश्न सुटू शकले नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली. त्यामुळे देश घडविण्यासाठी जनतेने भाजपला ताकद द्यावी, असे आवाहन करून  राजनाथ सिंह म्हणाले, की मागील निवडणुकीत पराभूत होऊनही गायकवाड सतत ५ वष्रे लोकांच्या संपर्कात राहिले, परंतु काँग्रेसचे खासदार मतदारसंघात फिरकलेही नाहीत. देशावर प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता असूनही अनेक प्रश्न सुटले नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, आत्महत्या आदी घटनांत लक्षणीय वाढ झाली. केंद्रातील काँग्रेस सरकारवर सुमारे साडेपाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. राज्यातील आघाडी सरकारनेही १५ वर्षांत भ्रष्टाचारात कळस गाठला. याउलट केंद्रात भाजपची सत्ता असताना महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. अफवांवर विश्वास न ठेवता प्रश्न सोडवण्यास, तसेच दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाना न्याय मिळवून देण्यासाठी आपणास मतदान करा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
‘मोदी बंडलबाज म्हणण्याचा आ. देशमुखांना अधिकार नाही’
‘बंडल’ मोजण्यात आयुष्य घालवणाऱ्या आमदार अमित देशमुख यांना मोदी बंडलबाज आहेत, असे म्हणण्याचा नतिक अधिकार नाही, असे सांगत संभाजी निलंगेकर यांनी देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. भ्रष्टाचाराबद्दल मतदारसंघात प्रचंड चीड असून गारपीटग्रस्तांना वेळेवर नुकसानभरपाई न देता त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शासनकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने महायुतीच्या उमेदवारास विजयी करावे, असेही ते म्हणाले.