अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात चालत असलेल्या गलथान कारभाराची पालकमंत्री सुनील तटकरे यांनी गंभीर दखल घेतली असून सोमवार, २० मे रोजी अलिबाग येथे एका भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते येणार असून, त्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांना याबाबत विचारणा करणार आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अलिबाग-कुरुळ रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये चार व्यक्तींचा मृत्यू झाला होता. अपघात  झाल्यावर रुग्णांना ज्या वेळी या दवाखान्यात आणले गेले त्या वेळी येथे कोणीच डॉक्टर उपस्थित नव्हता. विक्रम रिक्षा संघटनेने आंदोलन करताच येथील डॉक्टर हजर झाले व तद्नंतर रुग्णांना इलाज सुरू झाला. मृतदेह ताब्यात देते वेळी शवविच्छेदन करणारा गायबच होता, तो दीड तासानंतर आढळला. तद्नंतर सर्व प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तिष्ठत राहावे लागले. याबाबतची सविस्तर कैफियत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष- मंगेश दांडेकर यांनी वर्तमानपत्रातून मांडली होती. याची दखल खुद्द पालकमंत्री तटकरे यांनी घेतली आहे. सुतारवाडी येथील निवासस्थानी मंगेश दांडेकर यांनी सदर घटना सांगून यावर कार्यवाहीची मागणी केली. त्यावर पालकमंत्री तटकरे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारणा करणार असून, रुग्णांशी हेळसांड सहन केली जाणार नाही, असे अभिवचन दिले.