महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गात एनसीसी ५८ चा विभाग निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पण राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांना याबाबत कळविले नसल्याने एनसीसी बटालियन सुरू करण्यास पायाभूत सुविधांचे अडथळे येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कनिष्ठ व सीनियर विद्यालयांनी मोठय़ा प्रमाणात एनसीसीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर एनसीसी ग्रुप कमांडोजचे ब्रिगेडिअर सुभाष दीक्षित यांनी केले.
कोल्हापूर विभागाकडे एनसीसीच्या आठ विभागाचा समावेश आहे. ब्रिगेडिअर सुभाष दीक्षित यांच्याकडे सातारा, कऱ्हाड, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५८ एनसीसी महाराष्ट्र बटालियन स्थापन करण्यासाठी सर्व संबंधित महाविद्यालये, विद्यालयांनी कोल्हापूर ग्रुप कमांडरकडे अर्ज करावा, असे आवाहन ब्रिगेडिअर दीक्षित यांनी केले.
  पत्रकार परिषदेत बोलताना दीक्षित म्हणाले, राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विद्यार्थ्यांची बटालियन स्थापन करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला, पण राज्य शासनाने वर्षभर जिल्हाधिकारी यांना तसे कळविले नसल्याने कार्यालय जागा, कर्मचारी वर्ग व सरावासाठी ग्राऊंड उपलब्ध करून देण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. बटालियनचे सिंधुदुर्ग नगरी येथेच मुख्यालय असेल, असे ते म्हणाले.
या आर्थिक वर्षांत जिल्ह्य़ात एनसीसी बटालियन निर्माण केली जाईल. या ठिकाणी आर्मीच्या एक ऑफिसरसह चौदाजणांच्या नेमणुका सध्या करण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापूर ग्रुप कमांडर विभागात कर्नल गडेकरसह स्टाफ आहे, असे सुभाष दीक्षित म्हणाले.
सिंधुदुर्गनगरीत तीन-चार वर्षांसाठी बटालियनला कार्यालय, जागा मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केल्याचे सांगून बटालियनमध्ये आठवीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी असतील. या ठिकाणी कर्नलपदाचे अधिकारी त्यांना प्रशिक्षण व आर्मीतील शिस्तीसह शिक्षण देतील. जिल्ह्य़ात १० ते १२ विद्यालयात एनसीसी आहे. पण जिल्ह्य़ातील १५ ते १६ विद्यालयांतील साडेतीन हजार विद्यार्थी या बटालियनचा भाग होतील, असा प्रयत्न असून सर्व विद्यालये, महाविद्यालयांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बटालियनमध्ये एनसीसी प्रशिक्षण, साहसी क्रीडा स्पर्धा, डिसिप्लिन देण्यासाठी उपयोगी पडण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. थोडक्यात आर्मी-नेव्हीत दिले जाणारे शिक्षण देण्यात येणार असून शिवाजी महाराजांचा प्रताप व पन्हाळा ते विशालगडावर जाण्याचा साहसी प्रयत्न, महाराष्ट्राची संस्कृती शिकविली जाते. हे शिक्षण अन्य प्रदेशातील मुलांच्या कॅम्पच्या वेळी देण्यात येते. देशात आज एनसीसी ग्रुपमध्ये १५ लाख तरुणांचा सहभाग आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.
या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना तीन वर्षांत तीन सर्टिफिकेट दिली जातात. त्याचा उपयोग जवान, आर्मी भरतीसह अन्य सेवांत जाण्यास संधी देणाऱ्या ठरतात. या सर्टिफिकेटमुळे रिटर्न परीक्षा द्यावी लागत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या नोकरभरतीत संधी मिळते, असे सुभाष दीक्षित यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात साडेतीन हजार कॅडट्सचे उद्दिष्ट असून देशाच्या सेवेची संधी त्यांना मिळेल, असे ब्रिगेडिअर सुभाष दीक्षित यांनी स्पष्ट केले. ब्रिगेडिअर दीक्षित यांचे स्वागत कळसुलकर, संस्थेचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी कळसुलकर स्कूलमध्ये केले. यावेळी संचालक रमेश बोंद्रे, कळसुलकरचे एनसीसी शिक्षक गोपाळ गवस, एसपीके महाविद्यालयाचे डी. एन. पाटील व आरपीडीचे नामदेव मुठे यांनीही त्यांचे स्वागत केले.