तालुक्यातील कूळधरण, सुपेकरवाडी, राक्षसवाडी, धालवडी, बहिरोबावाडी, चिंचोली, टाकळी या गावांना गुरुवारी दुपारी पुन्हा गारपिटीने तडाखा दिला. बुधवारच्या तडाख्यातून सावरेपर्यंतच पुन्हा गारपीट झाल्याने आता मात्र शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी गुरुवारी सकाळी नुकसानीची पाहणी केली.
बुधवारी दुपारी कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांत झालेल्या गारपिटीमुळे दोन्ही तालुक्यांतील फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यासही या गारपिटीचा काही प्रमाणात फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज सकाळीच पिचड यांनी बाधित भागाची पाहणी केली. त्याच्या समवेत आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा कृषी अधिकारी माने, प्रांताधिकारी संदीप कोकडे, युवानेते विक्रम पाचपुते, राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र फाळके आदी होते.
कर्जत तालुक्यातील रुईगव्हण, शिंदा, कोपर्डी, पाटेगाव, पाटेवाडी, झिंझेवाडी, टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, बिटकेवाडी, जलालपूर, राक्षसवाडी, मलठण, खंडाळा, चापडगाव, रेहकुरी, कर्जत, निमगाव डाकू, वालवड, सुपा, बहिरोबावाडी, कापेरवाडी, राशिन, बारडगाव अशी ३२ गावे, श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव, आढळगाव, बावडी, घोडेगाव, काष्टी, पारगाव, लोणीव्यंकनाथ, पेडगाव, हिरडगाव, बेलवंडी, अशा १६ गावे व जामखेड तालुक्यातील गिरवली, हळगाव, चौंडी, आगी या ४ गावांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला.
कर्जत तालुक्यातील सुमारे ३ हजार हेक्टर व श्रीगोंदे तालुक्यातील १ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला या गारपिटीचा तडाखा बसला आहे. रुईगव्हण, कोपडी, शिंदा टाकळी व पाटेगाव या गावांमधील ५५० एकरावरील डाळिंबाच्या बागा नष्ट झाल्या आहेत. हापूस व केशर जातीच्या आंब्याच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पिचड यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल आज रात्रीपर्यंतच सादर करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल उद्याच मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असून तातडीने नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांत कामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची १९ पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके या सर्व गावांना जाऊन आजच प्राथमिक अहवाल सादर करतील अशी माहिती कोकडे व कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी दिली.