हल्ल्यात मरण पावलेले बदनापूर तालुक्यातील नानेगावचे सरपंच मनोज कसाब यांच्या कुटुंबीयांना समाजकल्याण विभागाच्या वतीने पावणेचार लाख रुपयांची मदत देण्यात आली.
जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व उपविभागीय महसूल अधिकारी मंजूषा मुथा यांनी गुरुवारी नानेगाव येथे भेट देऊन मदतीचा धनादेश कसाब यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. बुधवारी रात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या वतीनेही एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. बदनापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरील नानेगाव येथे बुधवारी रात्री सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी भेट दिली. मोघे म्हणाले की, या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्यासोबतच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमही लावण्यात आले असून सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात करण्यात येईल. मृत कसाब यांच्या वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीबाबत आणि त्यांच्या एका भावास शासकीय नोकरी देण्याचाही विचार करण्यात येईल, असे मोघे यांनी कसाब यांच्या कुटुंबीयांच्या भेटीच्या वेळी सांगितले.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी कसाब कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सरकार आपल्या पाठीशी असून अधिक आर्थिक मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष अॅड. एकनाथ आव्हाड यांनी कसाब कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणातील पोलीस तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक संजयकुमार यांनीही नानेगावला भेट दिली. रिपब्लिकनचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, माजी मंत्री गंगाधर गाडे, मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आदींनी आतापर्यंत नानेगावला भेट दिली.