माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या श्वान जमातीमध्येसुद्धा किती प्रकार आणि रंग असतात, याचा अनुभव येथे प्रथमच आयोजित ‘पेट शो’ या कार्यक्रमाद्वारे रत्नागिरीकरांनी घेतला. एफर्ट जिम आणि समर्थ पेट क्लिनिक यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित या अभिनव उपक्रमामध्ये पामेरियन, लॅब्रॅडॉर, डॉबरमन, जर्मन शेफर्ड यांसारख्या नेहमीच्या पाहण्यातील श्वानांबरोबरच चेहऱ्यावर गंभीर भाव दाटलेला नेपोलियन मिस्टिफ, शरीरभर केस सावरत डौलात चालणारा बुटका लासा अ‍ॅप्सो, गुबगुबीत गलेलठ्ठ सेन बर्नार्ड, लाखमोलाचा गोल्डन रिट्रिव्हर अशा काही आगळ्यावेगळ्या मंडळींनीही हजेरी लावली आणि उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यापैकी तब्येतीने सुदृढ दिसणाऱ्या श्वानांचा अंगभूत नाजूकपणा लक्षात घेऊन काही मालकांनी कार्यक्रम सुरू होईपर्यंत वातानुकूलित गाडय़ांमध्येच त्यांना जणू दडवून ठेवले होते, तर ग्रेट डेनसारखी अन्य काही तगडी मंडळी मात्र मैदानावर मालकाला ओढत उपस्थितांच्या छातीत धडकी भरवत होती.
या सर्व श्वानांची जातनिहाय आणि नंतर एकत्र स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये नेपोलियन मॅस्टिफ व सेन बर्नार्ड (बाबा बाइंग), लासा अ‍ॅप्सो (पराग साळुंखे), जर्मन शेफर्ड (हॉटेल ब्ल्यू ओशन व्ह्य़ूू, मालगुंड) आणि गोल्डन रिट्रिव्हर (अजित पवार) या पाच जणांनी बाजी मारली. मुंबईच्या राजश्री आपटे यांनी त्यांचे परीक्षण केले. रत्नागिरी पोलीस दलाच्या डॉग स्कॉडमध्ये राहून राज्य पातळीवर गुन्हे शोधण्यामध्ये चमकदार कामगिरी बजावलेले शेरू, वीरू, हिरा आणि सम्राट हे कार्यक्रमाचे खास पाहुणे ठरले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
रत्नागिरीत अशा दर्जाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ. अविनाश भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी या उपक्रमाचे स्वागत केले.