मेंदूची अपुरी वाढ, डोळ्याला आलेले टय़ुमर, फाटलेला ओठ, अशा अवस्थेत जन्माला आलेली ती जगली. केवळ जगली असे नव्हे तर दृष्टिहीनतेच्या प्रतिकूलतेवर मात करून अभिनय, नृत्य, गाणे यातील प्रावीण्याच्या जोरावर बालश्री पुरस्काराची मानकरी ठरली. तिची जगण्याची धडपड पुस्तकरूपाने शब्दबद्ध झाली. अनेकांच्या जीवनामध्ये प्रेरणा देणाऱ्या मनश्रीची ही मनस्वी गोष्ट साहित्य संमेलनामध्ये उलगडली.
साहित्य संमेलनातील ‘बालजल्लोष’ कार्यक्रमात सुमेध वडावाला- रिसबूड यांनी मनश्री आणि तिची आई अनिता सोमण यांच्याशी संवाद साधला. मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये पुरातत्त्वशास्त्र विषय घेऊन बी.ए.च्या अखेरच्या वर्षांला असलेल्या मनश्रीने ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘झुमका गिरा रे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ यांसह ‘देते कोण’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ ही गाणी सादर केली. रसिकांनी टाळ्यांचा ताल धरत मनश्रीला उत्स्फूर्त दाद दिली.
मनश्रीचा जन्म झाला तेव्हा ‘असे मूल आपल्याला का दिले’ या विचारांतून सुरुवातीचे दोन-तीन महिने मी खूप रडले, पण नंतर ‘मनश्रीला असे घडवेन की लोकांनी तोंडात बोटे घातली पाहिजेत,’ असा निश्चय केला.