सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल म्हणून गवगवा होत असलेल्या येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाचा लेखानगर ते भुजबळ फार्म हा टप्पा रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.  नाशिक शहरातून जाणाऱ्या महामार्गामुळे होणारी वाहतूककोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पाथर्डी फाटा ते पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल या दरम्यान उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यापैकी पाथर्डी फाटय़ाजवळील टप्पा याआधीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याप्रसंगी खा. समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे आदी उपस्थित होते. पुढील आठवडय़ात द्वारकापर्यंत उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार असून संपूर्ण उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्यास ३१ मार्चपर्यंत थांबावे लागणार आहे. पिंपळगाव-नाशिक-गोंदे या ६० किलोमीटर मार्गावर उड्डाणपुलाव्यतिरिक्त दोन मुख्य पूल आणि ११ छोटे पूल आहेत. याव्यतिरिक्त ३४ बस थांबे आणि चार ठिकाणी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता ठेवण्यात आला आहे. नाशिक महानगर क्षेत्रात या महामार्गाच्या कामावर आतापर्यंत एकूण ७०९.५२ कोटी (सव्‍‌र्हिस रोडवरील खर्च वगळून) रुपयांचा खर्च झाला आहे.