कर्नाटकातील अनेक भागांमध्ये हिजाबच्या वादाने पेट घेतल्यानंतर सरकारने उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मालेगावसह पुण्यात हिजाबच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसऱ्या राज्यातील घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन न करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून पुण्यात केंद आणि कर्नाटक सरकार विरुद्ध जोरदार आंदोलन सुरु आहे.

राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

तर दुसरीकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरुन आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटकात महाविद्यालयामध्ये मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घातल्यामुळे कर्नाटकच्या भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी आहेत. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा आल्या.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे प्रविष्ट करण्यात आले आहे.  त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव कायम असल्याने पोलिसांनी बंगळुरुमधील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दोन आठवडे आंदोलनबंदी लागू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बंगळुरुतील शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटरच्या आवारात आंदोलनास पोलिसांनी बंदी घातली आहे. दोन आठवडे ही बंदी लागू राहील़  हिजाब प्रकरण चिघळल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद असून, बहुतांश ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरु आहेत.