महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यावरून एमआयएम व शिवसेनेत वाद झाल्यानंतर शनिवारी शहरात तणावपूर्ण वातावरण होते. एमआयएमचे खासदार आवेसी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन झाले, तर मानवत घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी ‘बंद’ पाळण्यात आला.शुक्रवारी मनपाच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यास एमआयएमने विरोध केला. तसेच श्रद्धांजलीच्या वेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. आधी एमआयएम व नंतर शिवसेनेने स्वतंत्र पत्रक काढून एकमेकांवर टीका केली. रात्री उशिरा कलामंदिर परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी शहराच्या सर्वच भागात पोलीस बंदोबस्त वाढवला. शनिवारी सकाळी छत्रपती चौक, आयटीआय, अण्णाभाऊ साठे चौक परिसरात शिवसैनिकांनी एमआयएमचे खासदार आवेसी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध केला. या वेळी ‘बाळासाहेब अमर रहे’ या बरोबरच एमआयएमच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. जयवंत कदम, साई विभुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार यांनी एमआयएमने जातीय भावना भडकावल्याच्या आरोपावरून संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
एमआयएम-शिवसेना वाद निर्माण झाला असतानाच मानवत येथील घटनेच्या निषेधार्थ वेगवेगळ्या दलित संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. सकाळी वर्कशॉप, गणेशनगर, तरोडा नाका, भावसार चौक आदी भागात जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला.