लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. या स्नेहमेळाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने गद्दारी केल्याचे स्पष्ट होत असून पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी गुरूवारी केली.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यास आमदार डॉ. कदम, आणि अपक्ष उमेदवार पाटील यांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांशी हितगूज केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते संघटित राहावेत यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्याचे अधिकृत निमंत्रण देउनही जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील मदन पाटील युवा मंचने पाठ फिरवली होती.

आणखी वाचा-मते ३२-३३ टक्क्यापर्यंत घसरली तर भाजप सत्तेतून बाजूला – जयंत पाटील

यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. याचवेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेसचे नेते आमदार डॉ. कदम यांनीही या ठिकाणी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान हा मेळावा म्हणजे महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला विधानसभेची पायरीही चढू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिला आहे.