पुणे येथील गुन्हेगार बाळ शांताराम ढोरे व इंदापूर येथील दत्ताराम गायकवाड यांची हत्या केल्याची कबुली चौघा गुन्हेगारांनी दिली आहे. पोलिसांवर गोळीबार करणारे हे गुन्हेगार नाशिक येथील रूग्णालयात उपचार घेत असून त्यांनी पाच खून व डझनभर दरोडे घातल्याचेही प्राथमिक चौकशीत चौकशीत पुढे आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी नगर जिल्ह्यातील पुणे-संगमनेर रस्त्याने काही गुन्हेगार बोलेरो गाडीतून निघाले असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत तांबे यांच्यासह पोलीस पथकाने साकुर पठार भागात बोलेरो गाडी अडविली. त्यावेळी गाडीत बसलेला संतोष उर्फ लुभा चिंतामण चांदुलकर याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यात तांबे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात चौघे गुन्हेगार जखमी झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना आरोपी पकडण्यास मदत केली.
पकडलेले संतोष उर्फ लुभा चिंतामण चांदुलकर (रा. लवळे, ता. मुळशी), संतोष मच्िंद्र जगताप (रा. मोरवाडी, पिंपरी पुणे), काभ उर्फ राजू महादु पाथरे (रा. विद्यानगर, चिंचवड पुणे), सत्यपाल महादेव रुपवर (रा. जांब, ता. इंदापूर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळिबारात आरोपी जखमी झाले असून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिरीक्त पोलीस अधीक्षक सुनिता साळुंके-ठाकरे यांनी या गुन्हेगारांची चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी अनेक खून केल्याचे उघड झाले. या टोळीचा सुत्रधार संतोष चांदूलकर हा असून १७ जण त्याचे साथीदार आहेत. त्यांच्या टोळीतील प्रत्येकाकडे पिस्तुल वा रिव्हॉल्वर असते. ते मोटारी अडवून लूटमार करतात. नंतर त्याच मोटारी घेऊन पळून जातात. विरोध करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारतात. काल (शुक्रवार) त्यांनी सातारा भागातील एक बोलेरो अडविली. चालकाला जंगलात फेकून दिले. बोलेरोच्या मालकाला लूटले. नंतर ती बोलेरो घेऊन ते संगमनेरच्या दिशेने वरवंडी पठार भागात राहणाऱ्या आपल्या मित्राकडे आले होते. या गुन्हेगारांनी एक महिन्यापर्वी पुणे रस्त्यावर घारगाव नजीक कोपरगाव येथील रामचंद्र नामदेव सांगळे यांना अडवून त्यांना लुटले, त्यांची मोटार पळवून नेली. त्यावेळी लूटमार करणारांची रेखाचित्रे तयार करण्यात आली होती. ही रेखाचित्रे या गुन्हेगारांशी मिळती जुळती आहेत.
मुख्य सूत्रधार चांदूलकर याचा देहू रोड येथील बाळ ढोरे हा मित्र होता. ढोरे यानेही तीन खून केलेले होते. पण ढोरे व चांदुलकर याच्यात भांडणे झाली. त्यामुळे आठ महिन्यापूर्वी ढोरे याचा खून करण्यात आला. इंदापूर येथील दत्तात्रय गायकवाड यांचा या टोळीने खून केला आहे. सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या भागात शेकडो दरोडे या टोळीने घातले आहेत. टोळीतील मंगेश माणिक कांचन, सतिश किसन कुऱ्हाडे, गणेश मोहन बुचवडे, नवनाथ विलास चव्हाण, विजय ऊर्फ सुभाष खवले, संजय विरप्पा वाघमोडे हे गुन्हेगार फरार आहेत. या टोळीतील प्रत्येकावर अनेक गुन्हे आहेत. पुणे ग्रामीणचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक रवी परदेशी हे या टोळीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे व अतिरीक्त पोलीस अधिक्षीका साळंके-ठाकरे यांना कल्पना दिली. त्यामुळे गुन्हेगार पकडले गेले. आता पुणे व नगर पोलिस संयुक्तपणे या गुन्हेगारांच्या टोळीचा बिमोड करण्याच्या प्रयत्नास लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2013 रोजी प्रकाशित
सातारा, सोलापूर व सांगलीत शेकडो दरोडे
पुणे येथील गुन्हेगार बाळ शांताराम ढोरे व इंदापूर येथील दत्ताराम गायकवाड यांची हत्या केल्याची कबुली चौघा गुन्हेगारांनी दिली आहे. पोलिसांवर गोळीबार करणारे हे गुन्हेगार नाशिक येथील रूग्णालयात उपचार घेत असून त्यांनी पाच खून व डझनभर दरोडे घातल्याचेही प्राथमिक चौकशीत चौकशीत पुढे आले आहे.
First published on: 17-02-2013 at 04:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds of dacoity in satara solapur and sangli