पेण तालुक्यातील दादर खाडीत सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करावी, त्यांना सहकार्य करणारे हमरापूर मंडळ अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी श्रीकाळभरव हातपाटी वाळू उत्खनन व विक्री सहकारी संस्थेचे सदस्य बुधवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. काँग्रेसचे युवा नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैकुंठ पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पािठबा दिला. वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकरी शीतल तेली उगले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व आपल्या मगण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे श्रीकाळभरव हातपाटी वाळू उत्खनन व विक्री सहकारी संस्थेच्या सदस्यांनी आपले उपोषण मागे घेतले. दादर गावातील भातशेतीत खारे पाणी घुसल्यामुळे भातशेती नापीक झाली आहे. त्यामुळे या गावातील लोक हातपाटीने वाळू काढण्याचा व्यवसाय करतात. परंतु काही लोक या खाडीत सक्शन पंप लावून बेकायदा वाळूउपसा करून शासनाचे नुकसान करीत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या वाळूमाफियांवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे सक्शन पंप जप्त करावेत, हमरापूर मंडल अधिकऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.