चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या तालुक्यातील जळगाव (गाळणे) येथील एकनाथ सोमा संसारे यास येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. के. जी. राठी यांनी जन्मठेप ठोठावली आहे. एकनाथला पत्नी अनिता (२८) हिच्या चारित्र्याबाबत संशय होता. त्यातच १३ ऑक्टोबर २०१०च्या रात्री ती नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गल्लीत गरबा खेळण्यास गेली. त्यामुळे त्याच्या संतापात भर पडली. गरबा खेळून परत आलेली पत्नी घरात झोपली असता तिच्यावर त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतील अनितास सासरे सोमा संसारे यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळावरून पलायन केलेल्या एकनाथने बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथील लोकांनी त्याला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल केल्यावर तो बचावला होता. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. दुसऱ्या एका घटनेत बागलाण तालुक्यातील सारदे येथील दिलीप पर्वत खेडकर यास पत्नी संगीतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली. माहेरून पैसे आणावेत म्हणून दिलीप पत्नीचा छळ करीत असे. त्यामुळे तिला दहा वर्षे माहेरी राहावे लागले होते. या काळात न्यायालयाने तिला खावटी मंजूर केली असता त्याने खावटीची १५ हजारांची रक्कम थकवली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट काढले. तडजोड करत पत्नी संगीतास त्याने नांदावयास नेले. मात्र पुन्हा सुरू केलेला छळ असह्य झाल्याने २००७ मध्ये अंगावर घासलेट टाकून तिने पटवून घेतले होते. जायखेडा पोलिसांनी याप्रकरणी दिलीप तसेच त्याची आई सावित्रीबाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.