महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या पोस्टमुळे, तसंच त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. दरम्यान आता त्यांनी एका मुलाखतीत प्रश्नाला दिलेलं उत्तरही चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी तुम्हा एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

राजकारणात येण्यात रस नाही-अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी Curly Tales ला नुकतीच मुलाखत दिली आहे. कामिया जानीने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडली. या मुलाखतीत राजकारणात येणार का? हा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मी राजकारणात येणार नाही असं म्हटलं आहे. मी बँकिंग क्षेत्रात आहे, समाज सेवेचं काम करते. त्याचप्रमाणे गाणं गायलाही मला खूप आवडतं. पण मला राजकारणात येण्यामध्ये कुठलाही रस नाही. मी राजकारणात यायला इच्छुक नाही असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं. ज्यानंतर तुम्हाला एक दिवसासाठी मुख्यमंत्रिपद मिळालं तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं.

एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?

एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, “देवेंद्र फडणवीस यांनी इतकं काम केलं आहे की एक दिवसासाठीही मला मुख्यमंत्रिपद मिळेल की नाही माहीत नाही. मुंबईतल्या पायाभूत सुविधा, महाराष्ट्रासाठी आणलेले विविध प्रकल्प, अधिकारी वर्गामधे होणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आहे. तसंच अनेक प्रकल्प त्यांनी करायचं ठरवले आहेत मग तो नदीजोड प्रकल्प असेल किंवा इतर. पण तरीही एक दिवसासाठी मी जर मुख्यमंत्री झाले तर मी देवेंद्र फडणवीस आणि दिविजासह एखाद्या छान ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन” असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.

अमृता फडणवीस यांना कुणाचा राग येतो?

अमृता फडणवीस यांना या मुलाखतीत आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला सर्वात जास्त राग कसला येतो? त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “पाठीत खंजीर खुपसणाऱ्या म्हणजेच आपला विश्वासघात करणाऱ्या लोकांचा मला सर्वाधिक राग येतो. मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. तुम्ही समोर या आणि सच्चेपणाने वागा. विश्वासघात करणार असाल तर माझ्यापासून लांबच राहा. असंच मी सांगेन.” असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.