‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा..म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. काल (१७ एप्रिल) ते इंदापूर येथे वकिल आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. यामुळे आज त्यांनी यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. आज त्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे सपत्नी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

‘‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल”, असं अजित पवार म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचाही दावा केला गेला. रोहित पवारांनीही एक्सवरून पोस्ट करून निवडणूक आयोगाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. दरम्यान, आता अजित पवारांनी यावरून स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा >> उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते.

“कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो, आम्ही असं करणार तसं करणार. ते काही प्रलोभन दाखवणार का? विकासकामांना निधी देण्याचं कामच लोकप्रतिनिधींचं असतं. त्यामुळे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की आतापेक्षा जास्त निधी आणि जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आचारसंहितेचा भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी घेत असतो. छोट्या हॉलमधील वक्तव्य होतं”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

ते पुढे म्हणाले, राहुल गांधी परवा म्हणाले की आम्ही तुमच्या बँक खात्यात खटाखट पैसे टाकू तसं मी आमच्या ग्रामीण भाषेत म्हणालो की कचा कचा बटणं दाबा.

अजित पवारांनी काल दिवसभरात केलेली आक्षेपार्ह विधाने काय?

‘‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल, अन्यथा हात आखडता घेईन.’’

‘‘एक हजार मुलांमागे मुलींचा दर घसरल्याचे पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय, असे वाटते.’’

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you want funds push the buttons in evm pawars explanation after the controversial statement sgk