पुणे : ‘‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा..म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’ आणि ‘एक हजार मुलांमागे मुलींचा दर ७९० असल्याचे पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो,’’ अशी वादग्रस्त वक्तव्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी इंदापूर येथे केली. मात्र वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटताच लगेचच त्यांनी सारवासारवही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतील लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यापारी, डॉक्टर आणि वकील यांचे स्वतंत्र मेळावे घेतले. त्यांत भाषण करताना त्यांनी वरील वक्तव्ये केली. व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, ‘‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल,’’ त्यांच्या या वक्तव्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि टीका केली.

हेही वाचा >>>उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?

इंदापूर येथेच डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले, ‘‘माणूस खरे कोणाशी बोलतो, तर डॉक्टरशी. कारण वेदना होतात. खरे सांगितल्याशिवाय वेदनांवर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना थोडेसे कसे चालले आहे, मनात काय आहे, असे त्यांना विचारा. त्यांनी आमचे नाव घेतले, तर खूप चांगली वागणूक द्या, दुसऱ्याचे नाव घेतले, तर असे इंजेक्शन टोचा की..’’. पुढे वाक्य अर्धवट ठेवून आणि माफी मागून, ‘‘मला असे काही म्हणायचे नाही,’’ असेही पवार यांनी या भाषणात स्पष्ट केले.

डॉक्टरांनी काही जाचक सरकारी अटी शिथिल करण्याची मागणी पवार यांच्याकडे केली होती. याबाबत पवार म्हणाले, ‘‘सरकारी यंत्रणेकडून निश्चितच तुम्हाला त्रास होत असेल. काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि यापूर्वी एक हजार मुलांमागे ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. पण हा दर ७९० पर्यंत घसरला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही. डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल.’’

शरद पवारांच्या विधानाचा समाचार

शरद पवार यांच्या ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ या विधानाचा समाचारही अजित पवार यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना घेतला. ते म्हणाले,‘‘कल्पनाताई आणि प्रतिभाताई या डॉक्टर गेवराई आणि बीडच्या आहेत. मात्र, तुम्ही आमच्याकडे सून म्हणून आला आहात. सून म्हणून आला असला, तरी तुम्हाला आम्ही बाहेरच्या मानणार नाही. तुम्ही आमच्या घरच्या आहात, तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात.’’

आक्षेपार्ह विधाने काय?

‘‘मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल, अन्यथा हात आखडता घेईन.’’

‘‘एक हजार मुलांमागे मुलींचा दर घसरल्याचे पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय, असे वाटते.’’

विधानानंतर दुसऱ्या दिवशीही पडसाद, सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

दरम्यान, गुरुवारी सकाळी अजित पवारांना या विधानासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी “ध चा मा करू नका”, असं म्हणत स्पष्टीकरण दिलं. “मी ते विधान मिश्किलपणे केलं होतं, ते विधान करताना मी हसत होतो. त्यामुळे त्यावरून वाद घालणं चूक आहे”, असं अजित पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्यांनी “राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी”, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial statements of deputy chief minister ajit pawar again amy
First published on: 18-04-2024 at 06:18 IST