उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून याद्वारे राज्यातील युवा, गरीब, महिला, वारकरी यांच्यासह समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे, असे ते म्हणाले. हेही वाचा - राज्यातील सिंचन प्रकल्पांवरून अजित पवारांची जयंत पाटलांना कोपरखळी; म्हणाले, “आपल्या वेळी प्रकरण…” अजित पवार यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अर्थसंकल्प मांडण्यात आम्ही नवखे नाही, अनेक वर्ष राज्यकारभार बघत असल्याने एखादा निर्णय घेतल्यावर त्यांची अंमजबावणी करताना तेवढा निधी आपल्याकडे आहे का? याचा विचार करूनच हा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी वीज माफी द्यायची आमच्या मनात होतं. त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना वीज माफी दिली आहे, असे ते म्हणाले. या अर्थसंकल्पातून विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण गायीच्या दुधाला पाच रुपये वाढवून दिले आहेत. आम्ही प्रशिक्षणार्थी तरुणांना १० हजार रुपये महिन्याला देणार आहोत. दरवर्षी १० लाख मुलांना ही मदत मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. हेही वाचा - “चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…” आज अर्थसंकल्पातील रक्कम कमी दिसत असली, तरी काही दिवसांत पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. केंद्रात आमच्या विचारांचं सरकार आहे. लवकरच १६ वा वित्त आयोग सुरू होणार आहे. त्यातूनही भरीव निधी महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यामुळे आज ज्या घोषणा करण्यात आल्या, त्याची अंमरबजावणी करण्याकरिता कुठेही निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील युवा, गरीब, महिला, वारकरी यांच्यासह समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.