छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात गोदा पट्ट्यातील वाळू उपशासाठी आणि परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परांची संख्या तब्बल साडेबाराशेंच्या घरात आहे. त्यातही सर्वाधिक टिप्पर हे अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असून, त्यातील परळी तालुक्यात सर्वाधिक २७६ टिप्पर आहेत. या संदर्भातील माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

बीड कार्यालयांतर्गत बीड, गेवराई, आष्टी, शिरूर कासार व पाटोदा हे पाच तालुके येतात. या पाच तालुक्यांमध्ये मिळून ५५० टिप्पर आहेत; तर अंबाजोगाई कार्यालयांतर्गत अंबाजोगाई, परळी, वडवणी, केज-धारूर व माजलगाव तालुके येतात. अंबाजोगाईमध्ये २०४, परळीत २७६, धारूरमध्ये ६९, वडवणीत ६, केजमध्ये ११३ व माजलगावमध्ये ३८ टिप्पर असल्याची माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेची वाहतूक टिप्परद्वारेच होत असल्याचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतो आहे. या वाहतुकीतून प्रदूषणाचा धुरळा उडत असून, त्या संबंधीचे कुठलेही नियम पाळले जात नसल्याची चर्चा अलीकडे परळीतील वाल्मीक कराडच्या अटक प्रकरणानंतर सुरू झाली. याच दरम्यान, १२ जानेवारी रोजी परळीजवळील सौंदणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याचे प्रकरणही माध्यमांमधून चर्चत आले. त्यात ३० जानेवारी रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परळीत एका पोलीस कर्मचाऱ्याकडे अनेक जेसीबी आणि टिप्पर असल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना करून खळबळ उडवून दिली. यातून बीड जिल्ह्यातील टिप्परांची संख्याही चर्चेत आली आहे.