पालघर हत्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावरुन आग लावण्याचे काम सुरु आहे. या आग लावणाऱ्यांचा शोध घेणं आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला.

“मॉब लिंचिंगचा प्रकार अत्यंत वाईट आहे. हे असं घडता कामा नये. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. जे गुन्हेगार असतील, त्यांनी हत्या केली आहे. पोलिसांवर हल्ला केला आहे एकही आरोपी सुटणार नाही” असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

आणखी वाचा- पालघरमधील हल्ल्याला धार्मिक रंग चढवू नका : मुख्यमंत्री

त्याचवेळी त्यांनी सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांचा शोध घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. “सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांचा शोध घ्या असे मी अमित शाह यांना सांगितले आहे. तुम्ही शोध घ्या, आम्ही सुद्धा घेतो कारण प्रत्यक्षात घडलेलं असतं वेगळ. आगी लावणारे आगी लावून जातात. त्यांच्यापर्यंत झळा पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्यांना शोधणं गरजेचं आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.