शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. ४० आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर उरलेले १५ आमदार अद्याप उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अपक्ष आमदार शंकरराव गडाख देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत. गडाख यांनी अहमदनगरमध्ये केलेल्या जाहीर भाषणात मोठं विधान केलं आहे. शिवसेना ही जहाल संघटना असून बंडखोरी होताना रक्ताचे पाट वाहिले असते, असं त्यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर येथे केलेल्या जाहीर भाषणात ते म्हणाले की, “मंत्रीपद गेलं याचं वाईट वाटत नाही, पण विकासकामं थांबतील, याचं वाईट वाटतंय. पण माझ्यामध्ये काही कौशल्ये आहेत, त्या कौशल्याच्या माध्यमातून मी विकासकामं पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. पण वाईट याचं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसाला अशा पद्धतीने घरी जावं लागलं आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मला याठिकाणी एक आवर्जून सांगायचं आहे. उद्धवसाहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तामध्ये एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केली आहे, असा बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होता. राज्यामध्ये नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती, तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा”, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भाषणानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असलो, तरी काही सिद्धांतामुळे मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आलो होतो. बंडखोरी झाल्यानंतर देखील मी उद्धव ठाकरेंना फोन केला. मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याबरोबरच राहणार, असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला आहे. अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरेंसोबत राहिलो आहे,” असंही ते म्हणाले.