कायद्याची अंमलबजावणी करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस खात्याची प्रतिमा धुळीस मिळविण्याचे कृत्य सोलापूर जिल्हय़ातील एका पोलीस अधिका-याने केले आहे. एका गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी गेलेल्या या पोलीस अधिका-याने एका निष्पाप सामान्य माणसाच्या मानगुटीवर पाय ठेवून जणू उन्मत्त राजेशाहीचे दर्शन घडविले. सांगोला तालुक्यातील नाझरे येथे घडलेल्या या संतापजनक घटनेची वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
सांगोला पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर असे या वादग्रस्त पोलीस अधिका-याचे नाव आहे. त्यांची तातडीने विभागीय चौकशी सुरू झाली असून, येत्या दोन दिवसांत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सोलापूर ग्रामीण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले.
सांगोला तालुक्यातील नाझरे येथे एका खूनप्रकरणाच्या तपासासाठी खडकीकर हे गेले होते. परंतु तपासकाम करताना विश्रांतीच्या ठिकाणी त्यांनी खुर्चीवर स्थानापन्न होऊन एका निष्पाप सामान्य माणसाच्या मानगुटीवर पाय ठेवला. मानगुटीवर आडवा पाय ठेवल्यानंतर खाकी वर्दीतील या पोलीस अधिका-याने डोळय़ावर काळा गॉगल लावून मोबाइलवरून गप्पा मारल्या. पोलीस अधिका-याच्या या वर्तणुकीतून त्याचा उद्दामपणा तर स्पष्ट झालाच, शिवाय मानवी हक्काची पायमल्ली होऊन कायदा तथा लोकशाही मूल्यांचे अक्षरश: िधडवडे निघाले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याची तातडीने गंभीर दखल घेतली. खडकीकर यांची उपविभागीय पोलीस अधिका-यामार्फत विभागीय चौकशी सुरू झाली असून येत्या दोन दिवसांत ठोस कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दोशी यांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली गेल्याने हा चच्रेचा विषय झाला आहे.