इन्सुली ग्रामपंचायतीचा २० फेब्रुवारीला मोर्चा
इन्सुली स्विनिंग मिल जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अन्यथा शासनाने उद्योगधंदे सुरू करावे म्हणून येत्या २० फेब्रुवारी रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचे इन्सुली ग्रामपंचायत ग्रामसभेत ठरविण्यात आले. इन्सुली सूतगिरण जमीन हस्तांतरण प्रक्रिया थांबवावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा ठराव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
इन्सुली ग्रामपंचायत ग्रामसभा नंदू पालव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी सरपंच नम्रता खानोलकर, उपसरपंच नाना पेडणेकर, पंचायत समिती सदस्य नारायण राणे, प्रताप सावंत, तात्या वेंगुर्लेकर, उल्हास हळदणकर, ग्रामसेवक हांडे व ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
इन्सुली सूतगिरणसंदर्भात वकिलाने दिलेल्या नोटिसीत ग्रामसभा व सरपंच यांचा अवमान होईल असे शब्द वापरल्याने त्याचा निषेध करण्यात आला. तसे त्यांना कळवा अशी मागणी सचिन पालव यांनी केली. गुरुनाथ पेडणेकर, विकास केरकर यांनी त्याला अनुमोदन दिले.
इन्सुली सूतगिरण जमीन कूळ कायद्याची होती. पण सन १९७७ मध्ये नोकरीच्या अपेक्षेने ही जमीन गिरणीसाठी प्रतिगुंठा तीन रुपयाने दिली. पण आता ही जमीन बिल्डर्सच्या घशात घालून उद्देशाला सरकारने हरताळ फासला असल्याने ग्रामसभेत नाराजी व्यक्त केली. या विषयी विकास केरकर, गुरुनाथ पेडणेकर, सचिन पालव, उल्हास सावंत, संजय तावडे, कृष्णा सावंत, मनोहर गावकर, बाळू मेस्त्री, बापू कोठावळे, बाबुराव सावंत यांच्यासह सर्वानी नाराजी व्यक्त केली.
इन्सुलीच्या ग्रामसभेने येत्या २० फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्या नियोजनासाठी येत्या १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. कोंडवाडा येथे पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले.
इन्सुली सूतगिरणीच्या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. सरकारने जमिनी परत कराव्यात, अन्यथा शासनाचे उद्योग उभारावेत असा ठराव करण्यात आला. शिवाय जमीन हस्तांतरण प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी व तहसीलदारांना कळविण्याचे ठरले. तसेच सूत गिरणीच्या कडील विद्युत रोषणाई थांबवावी असेही ठरविण्यात आले.
या प्रश्नावर नारायण राणे, नंदू पालव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभेने आंदोलन करण्यासाठी एकजूट दाखविण्याचा निर्णय घेतला.
इन्सुली सूतगिरण प्रश्नावर लोकांनी न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाच्या मार्गावर ठामपणा दर्शविला.
इन्सुली-गावठण येथील मागासवर्गीय समाजाचा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नावर प्रथम मार्ग काढा आणि नंतरच कॉजवेचे काम करा असे या वस्तीमधील लोकांनी सुचविले, तसेच ग्रामपंचायतीत मागासवर्गीय सदस्य स्वीकृत म्हणून घ्यावा अशी मागणीही करण्यात आली.
या ग्रामसभेत इन्सुली गाव विकास योजना तसेच केलेली कामांबाबत चर्चा करण्यात आली, तसेच ग्रामसभा निमंत्रण सर्वाना मिळावी अशी मागणी करण्यात आली.