आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाला ‘मुलीला विष पाजून मारा किंवा स्वत: आत्महत्या करा’ असे हिणवून वाळीत टाकणाऱ्या नाशिकमधील जोशी (भटक्या) समाज पंचायतीच्या अध्यक्षासह सहा सदस्यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे, या मुलीच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथील सहा कुटुंबांनी जोशी समाज पंचायतीच्या अन्यायकारी फतव्यांची कर्मकहाणी कथन केली.
एका मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे कुटुंबातील उर्वरित मुलींची लग्न होऊ न देता त्यांना कुमारिका म्हणून जीवन जगण्यास भाग पाडणे, मुलीचे लग्न नाशिकऐवजी मुंबईला केले म्हणून आईला जातीतून बहिष्कृत करणे, असे अनेक ‘फतवे’ काढत या जोशी समाज पंचायतीने समाजातील कुटुंबांचा छळवाद मांडला आहे. येथील आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीचे वडील अण्णा हिंगमिरे यांना या जात पंचायतीकडून ‘मुलीला विष पाजून मारा किंवा स्वत: आत्महत्या करा’ असा त्रास काही दिवसांपासून देण्यात येत होता. पंचायतीने त्यांना जातीतून कायमचे बहिष्कृत तर केले, शिवाय, त्यांच्या मुलीला भेटण्यासही मज्जाव करण्यात आला. आपण समाजातील कोणा व्यक्तीच्या कोणत्याही कार्यक्रमास दिसलो तर तो कार्यक्रम असणाऱ्या व्यक्तीलाही जातीबाहेर टाकले जाईल अथवा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आपणास बजावल्याचे हिंगमिरे यांनी म्हटले आहे.
वैतागलेल्या हिंगमिरे यांनी पंचायतीविरोधात पोलीस आयुक्तांकडे जाण्याचे धारिष्टय़ दाखविले. त्यानंतर याप्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आणि पंचायतीने घेतलेले भयावह निर्णय उघड झाले. या प्रकरणी पंचायतीचे अध्यक्ष व सदस्य अशा एकूण सहा जणांना अटक झाली असून त्यात येथील मनसे नगरसेवकाच्या वडिलांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी जात पंचायतीचे अध्यक्ष भास्कर शिंदे याच्यासह भिमराव गंगाधर धुमाळ, रामदास बापू धुमाळ, मधुकर बाबूराव कुंभारकर, एकनाथ निळूभाऊ शिंदे, शिवाजी राजू कुंभारकर या सदस्यांनाही अटक केली.