जालना : मराठा आंदोलन संपविण्यासाठी सरकार षडयंत्र करीत असून त्याबाबत निर्णायक विचार करण्यासाठी येत्या रविवारी (दि. २५) बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. सगेसोयरे हा शब्द असलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी या बैठकीत विचार करण्यात येईल. ही बैठक दुपारी १२ वाजता आंतरवाली सराटी येथे होणार आहे,

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, सरकारचा कोणताही डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री पाठीशी असल्याचे सांगून एकजण गावोगाव फिरत असून एखाद्या नाराज व्यक्तीस गुलाल उधळण्यासाठी मुंबईला घेऊन जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तीन राजे असा उल्लेख करून त्यांनी समाजास वेठीस धरू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधिसूचनेची अंमलबजावणी का केली जात नाही, असा प्रश्न विचारतानाच दहा टक्के आरक्षण नाकारले म्हणून वेठीस धरणार असाल तर समाज तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणेल, असा इशाराही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला.

हेही वाचा >>>वर्षभरात ४५ नव्या राजकीय पक्षांची नोंद, राज्यातील एकूण पक्षांची संख्या ३९६; निवडणूक आयोगाकडून माहिती

अधिसूचनेची अंमलबजावणी काही मंत्री किंवा एखाद्या व्यक्तीमुळे थांबविली जात असून सहा लाख हरकतींची छाननी नऊ दिवसांपासून केली जात नाही, अशा आरोप करून जरांगे पाटील म्हणाले, की रात्रीतून कोणते कोणते आमदार एकत्र येत आहेत आणि आपल्या आंदोलनाविरुद्ध कोणते षडयंत्र आखले जात आहे, ते रविवारच्या बैठकीत जाहीर केले जाईल. आंदोलनात काही बदल करणे याचा अर्थ माघार घेणे नाही. आंदोलकांना सहकार्याचे भूमिकेचे आवाहन करणारे अशोक चव्हाण आतापर्यंत समाजाकडून बोलत होते. आता दोन्ही बाजूंनी वाजायला लागेल. त्यांना समाज, जात काही कळते की नाही, असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला.

आंदोलक-पोलिसांत बाचाबाची

’जालना जिल्ह्यातील धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथे रस्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलीस ठाण्यात नेताना पोलिसांबरोबर वादावादी तसेच धक्काबुक्की झाली.

’परतूर तालुक्यातील वाटूर येथे जालना-मंठा रस्त्यावर झालेल्या आंदोलनावेळीही आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्ह्यात आठ-दहा ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

’नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या वेगवेगळय़ा भागांतील राज्य, राष्ट्रीय महामार्गासोबतच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.