सांगली : सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी करण्यात आलेल्या राजकीय खेळीमध्ये आमदार जयंत पाटील हेच खरे खलनायक असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी जतमध्ये केला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी सायंकाळी जतमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जगताप बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि उमेदवार श्री. पाटील उपस्थित होते.

भाजपने उमेदवार बदलावा असा आग्रह आम्ही प्रारंभी पक्षीय पातळीवर धरला होता. मात्र, कोणालाही न विचारता पुन्हा विद्यमान खासदारानांच उमेदवारी दिल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. यातूनच आम्ही कार्यकर्त्यांनी भाजपमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे जगताप म्हणाले.

हेही वाचा…मजुरीचे पैसे मागितले म्हणून केला खून, अलिबाग तालुक्यातील किहीम येथील घटना

ते पुढे म्हणाले, सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटीलच; संजय राऊत यांच्या द्वारे जयंत पाटील यांनी राजकीय खेळी केली आहे. वसंतदादा यांच्या नातवाला उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही दुःखद घटना आहे. हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्या द्वारे जयंत पाटील यांनी ही खेळी खेळली.

हेही वाचा…“पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नाही, हेडमास्तर पुन्हा…”; जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

वसंतदादा यांचे नव्वद वर्षातील काँग्रेसमधील योगदान पाहून वरिष्ठ मंडळींनी विशाल यांना तिकिटासाठी महाराष्ट्र, दिल्लीचे खेटे लावायला नको होते. एकेकाळी सांगलीतून तिकीट ठरवले जात होते. शिवाय, ज्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य नाही. अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यासाठी आग्रह धरला. यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचले, असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले.