अनियमित मासे उत्पादनामुळे त्रासलेल्या कोकणातील मच्छिमारांपुढे आता जेली फिशच्या आक्रमणाची समस्या निर्माण झाली आहे.
गेली तीन वष्रे कोकणातील मच्छिमार मासळीचे उत्पादन नियमितपणे मिळत नसल्यामुळे संत्रस्त झाला आहे. हवामानातील बदलाबरोबरच आधुनिक मच्छिमार बोटींची वाढती संख्याही या परिस्थितीला कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे पापलेट, सुरमई, बांगडा यासारख्या चविष्ट जातींचे प्रमाण कमी होत असले तरी अन्य काही  दुय्यम दर्जाच्या माशांचे प्रमाण कायम असल्यामुळे मत्स्यदुष्काळ म्हणण्यासारखी स्थिती येथे नाही. त्यातच आता जेली फिश या विशिष्ट प्रकारच्या माशाचे येथील समुद्रात आक्रमण वाढले आहे. हा मासा खाण्यास निरुपयोगी असतोच, शिवाय त्याच्यामुळे अन्य जातींचे मासे दूर जातात, असा अनुभव आहे. समुद्रातील जेली फिशचे प्रमाण वाढण्याचे कारण अज्ञात आहे. तसेच ते कमी करण्यासाठी उपायही नाहीत. त्यामुळे मच्छिमारांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
जेली फिशप्रमाणेच केंड हा आणखी एका वेगळ्या जातीचा मासा मच्छिमारांचा दुष्मन मानला जातो. त्याचे अस्तित्व कोकण किनारपट्टीवर दिसू लागले आहे. मच्छिमाराची जाळी हा मासा कुरतडतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. कारण अशा प्रकारे कुरतडलेली जाळी दुरुस्त करण्याचा खर्च कित्येक हजार रुपयांपर्यंत जातो.
दरम्यान यंदाचा मच्छिमारी मौसम सुरू होऊन चार महिने पूर्ण होत आले आहेत. त्यापैकी सुमारे दीड महिना विविध प्रकारच्या माशांचे चांगले उत्पन्न मिळाले. पण त्यानंतर पुन्हा उत्पादनात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार सुरू झाले आहेत. त्यामुळे मच्छिमार हवालदिल झाला असल्याचे मच्छिमार नेते एच. ए. राजपूरकर यांनी नमूद केले.