पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० हजार कोटी रुपयांच्या गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. बिहारपासून या अभियानाला प्रारंभ झाला असून, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधताना गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मरण केलं होतं. मोदी यांच्या या भाषणावरून राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांना टोला लगावला आहे.

करोना व लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करणारे लाखो कामगार आपापल्या गावी परतले आहेत. या मजुरांना गावीच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं. पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील खगरिया गावापासून या अभियानाची सुरूवात केली. त्यावेळी बोलताना त्यांनी गलवान खोऱ्यात संघर्षात होऊन शहीद झालेल्या बिहारमधील जवानांचं स्मरण केलं. त्याचबरोबर लडाखमधील पराक्रम बिहार रेजिमेंट केला आहे. प्रत्येक बिहारी व्यक्तीला याचा अभिमान वाटायला हवा, असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.

मोदी यांनी केलेल्या या विधानावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात बिहार निवडणुकीचा उल्लेख केला आहे. “बाय द वे, बिहार निवडणुका याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. निवेदन संपले. धन्यावाद”, असं म्हणत आव्हाड यांनी म्हटलं आहे.

देशात व बिहारमध्ये करोनाचं संकट गंभीर होत आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभेच्या निवडणुकीची लगबगही सुरू झाली आहे. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच बिहार मध्ये व्हर्च्युअल रॅली घेतली होती. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभही बिहारपासून केल्यानं राजकीय वर्तुळातून त्याचा संबंध निवडणुकीशी लावला जात आहे.