नगर येथील जवखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाला पाशवी आणि क्रूर हे दोन शब्द कमी पडावेत, अशी स्थिती आहे. जवखेडय़ाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायला हवे, अशी विनंती केली होती. त्यांनीही ती मान्य केली आहे, मात्र ते अजून गेले नाहीत. या प्रकरणी आता सीबीआय किंवा आतंकवाद विरोधी पथकाकडून तपास केला जावा, अशी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. औरंगाबाद येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
 नगर जिल्हय़ात आतापर्यंत ११३ दलित विरोधी प्रकरणे झाली आहेत. केवळ दोन टक्के प्रकरणे न्यायालयात आली. खर्डा प्रकरण असो किंवा जवखेडा, मानसिकता सारखी आहे. क्रूरपणे हत्या करण्याची तालिबानी संस्कृती आमच्यामध्ये कोठून येते, असा सवाल करत अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अशी ६ न्यायालये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काहीच घडले नाही. खरेतर असे अन्याय, अत्याचार घडल्यानंतर समाज पेटून उठायला हवा. मात्र, तसे होत नाही. दिल्लीमधील बलात्कार प्रकरणानंतर मेणबत्ती संप्रदाय पुढे येत होते. ते आता कोठे गेले आहेत, असा प्रश्न विचारत जवखेडा प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ज्या दलित संघटना पुढे आल्या. त्याला नक्षल चळवळीचा हातभार लागत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, हा प्रकार चळवळ दडपण्याचा आरोपही प्रा. कवाडे यांनी केला. आरोपींचा शोध लावावा, या मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढणार असल्याचेही ते म्हणाले.