देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘कलांगण’ हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून राज्यात १२ ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
तावडे म्हणाले, वीरश्री आणि संगीत यांचा मिलाप असलेला पोलीस बँड, संरक्षण दलाचा बँड, वैभवी गौरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेद्वारे दर्शन यांचा समावेश असलेला हा उपक्रम मुंबई आणि महसुली विभागाच्या मुख्यालयासह अन्य जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दर रविवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सादर होणार आहे.
राज्यातील १२ शहरांतील सार्वजनिक ठिकाणी, मैदानात वा उद्यानात हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहयोगाने सादर केला जाईल, असे सांगून तावडे म्हणाले, पोलीस वाद्यवृंदाबरोबरच उपलब्ध असल्यास संरक्षण दलाचे अथवा निमलष्करी दलाचे बँड, स्काऊट ॲड गाईडचे बँड, त्याशिवाय दर्जा पाहून शाळांच्या निवडक वाद्यवृंदांनाही यात सहभागी करुन घेतले जाईल.
मुंबई येथे पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील प्रांगण, ठाणे येथे तलाव पाळी, पुणे येथे शनिवारवाडा, कोल्हापूर येथे रंकाळा तलाव, औरंगाबाद येथे कॅनॉट गार्डन, बीड येथे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, नाशिक येथे प. सा. नाट्यगृह पटांगण, जळगाव येथे काव्य रत्नावली चौक, नागपूर येथे हनुमाननगर झोन क्र. ३ त्रिकोणी मैदान, चंद्रपूर येथे आझाद गार्डन, अमरावती येथे राजकमल चौक आणि बुलढाणा येथे गांधी भवन, जयस्तंभ चौक या ठिकाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.
या निमित्ताने पोवाडा, गोंधळ, वाघ्यामुरळी, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, दंडार, युध्दकला या सारख्या लोककलांचे सादरीकरण स्थानिक लोककलावंतांकडून केले जाईल, असेही तावडे यांनी सांगितले.