रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या भागात असलेल्या समृद्ध कांदळवनांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘कांदळवन पर्यटन’ योजनेअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील पावस या गावाची निवड करण्यात आली आहे.  कांदळवन पर्यटनाला गती देण्यासाठी हा नवीन प्रकल्प कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई व कांदळवन कक्ष (रत्नागिरी) यांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे.  प्रायोगिक तत्त्वावर ही योजना रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुरू झाली आहे. यापूर्वी खेड तालुक्यातील सोनगाव येथे क्रोकोडाईल सफारी आणि दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे निसर्ग पर्यटन योजना राबवण्यात आली असून आता रत्नागिरी तालुक्यातील पावस गावाची निवड ‘कांदळवन पर्यटन गाव’ करण्यात आली आहे. गावातून वाहणारी गौतमी नदी ही रनपार खाडीला जाऊन मिळते. या खाडीच्या किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र असून याठिकाणी पांढरी चिपी, कांदळ, तिवर, काटेरी, हुरी, किरकिरी, सुगंधासह तब्बल नऊ प्रकारच्या कांदळवन प्रजाती आढळल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस प्रकारचे पक्षी आणि कोल्हा व घोरपडसारखे प्राणी, खाडीमध्ये विविध प्रजातीचे प्राणी, मासे, खेकडे यांचे वास्तव्यही आढळून आले आहेत.

स्वामी स्वरूपानंदांचे वास्तव्य आणि स्मृती मंदिरासाठी पावस यापूर्वीच प्रसिद्ध आहे. आता या परिसरातील समृद्ध कांदळवनाचे जतन-संवर्धन करण्यासाठी आणि पर्यटनांतून उद्योग निर्मितीसाठी येथे हा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून निसर्गप्रेमी आणि अभ्यासक पर्यटकांसाठी निसर्ग निरीक्षणाचा वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी कांदळवनाच्या विविध प्रजातींवर माहितीही दिली जाणार आहे. किनारपट्टी अधिनियमन क्षेत्रांतर्गत (सीआरझेड) हा परिसर असल्यामुळे येथील कांदळवनांचे कोणतेही नुकसान न करता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर पावस गाव आधीपासूनच ओळखले जाते. स्वामी स्वरूपानंदांची पावनभूमी  म्हणून याला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचाही फायदा या उपक्रमाला निश्चितपणे मिळणार असून पर्यटकांची वर्दळ वाढली की परिसरातील छोटय़ा-मोठय़ा  व्यावसायिकांनाही लाभ होणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पावस येथे कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून गंधर्व कांदळवन निसर्ग पर्यटन गटाह्णमार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. येणाऱ्या पर्यटकांना या भागात योग्य प्रकारे माहिती व मार्गदर्शन करता यावे यासाठी या गटाच्या सदस्यांना कांदळवनाची ओळख, निसर्गभ्रमंती, पक्षी निरीक्षण यांच्या कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन घेऊन त्यांची तयारी करून घेण्यात आली आहे. सद्य:स्थितीत शाळेच्या विद्यार्थ्यांनाही या गटाच्या सदस्यांकडून माहिती देण्याचे काम सुरू झाले आहे. जलपर्यटन, मासेमारी प्रशिक्षण, हौशी मासेमारी इत्यादी प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी रत्नागिरी कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, उपजीविकातज्ज्ञ वैभव बोंबले, प्रभारी समन्वयक स्वस्तिक गावडे विशेष मेहनत घेत आहेत.