बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी शिवसेनेवर टीका केली असून पळपुटे असा उल्लेख केला आहे. कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. कंगनाने आपल्याला मुंबईत येऊ नको अशा धमक्या दिल्या जात असल्याचं सांगताना ९ सप्टेंबरला रोखून दाखवण्याचं आव्हानच दिलं होतं. कंगना मुंबईत येणार त्याच दिवशी महापालिकेकडून जुहू येथील तिच्या कार्यालयावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यावरुन वाद अजून पेटला आहे.

आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची आई आशा रणौत यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी शिवसेनेचा पळपुटे असा उल्लेख केला. पुढे त्या म्हणाल्या की, “संपूर्ण भारत आपल्या मुलीचं समर्थन करत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानते. माझ्या मुलीचं संरक्षण केल्याबद्दल भाजपाचे आभार”.

आशा रणौत यांनी यावेळी कंगना मुंबईतच राहणार असल्याची माहिती दिली आहे. “कंगना महाराष्ट्रातच राहणार आहे. १५ वर्षांपासून ती मुंबईत असून अर्ध आयुष्य तिने तिथंच घालवलं आहे. महाराष्ट्र हा सर्वांसाठी आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी आमचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतं. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत असं म्हटलं होतं.