महान अष्टपैलू क्रिकेटपटू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचा माजी कर्णधार पद्मविभूषण कपिल देव यांनी शुक्रवारी औरंगाबादेत उतरल्यावर हाती बॅट न घेताच लीलया शाब्दिक चौकार नि षटकार लगावले!
कपिलदेव यांच्या चाहत्यांना या चौकार-षटकारांनी मंत्रमुग्ध केले. निमित्त होते व्हेरॉकच्या वतीने आयोजित टी-२० क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाचे. इंग्रजीतून सूत्रसंचालन करणाऱ्याने कपिल देव यांना भाषणासाठी पाचारण केले आणि त्यांनी बॅटिंग सुरू केली. ‘हिंदी में बोलुंगा तो चलेगा? आजकल थोडी अंग्रेजी जादा है’ असे म्हणत त्याने भाषण सुरू केले आणि सुरुवातीला ‘नाही नाही’ म्हणत गुरुवारी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवावर मार्मिक भाष्यही केले. कालच्या सामन्याबद्दल काही बोलणार नाही. चांगला संघ, पण वाईट खेळला. कालच्या सामन्याविषयी काही बोललोच तर वाईट बोलावे लागेल,अशी कपिल देवची प्रतिक्रिया होती.
येथे आयोजित टी-२० च्या सामन्याच्या उद्घाटनापूर्वी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये संवाद साधताना कपिल म्हणाला की, आम्ही क्रिकेट खेळायचो, तेव्हा आई-वडील खेळू नकोस, असे सांगायचे. आता वातावरण बदलू लागले आहे. यशस्वीतेचे मापदंड बदलत आहेत. प्रत्येक आई-बापाला वाटते, आपल्या मुलाने मोठे, श्रीमंत व्हावे. त्यामुळे खेळातील रुची वाढल्याचे सध्याचे वातावरण आहे. औरंगाबादसारख्या शहरात सामने खेळविले जातात, त्याला मोठे प्रायोजकही मिळातात, हे चांगले लक्षण आहे याचा उल्लेख कपिल देव यांनी केला. परंतु लगेच ते पुढे असेही म्हणाले की, माझ्यासारख्या खेळाडूंना या स्पर्धासाठी बोलावणे तसे खर्चिकच असते. आम्ही विमानाने येतो. कोणाच्या तरी खिशातून पैसे जातातच. पुढच्या वेळी येईन, तेव्हा अधिक खर्च करणार नाही. नक्की पुढच्या वेळी बोलवा, असे सांगत त्यांनी हशा पिकवत टाळ्या वसूल केल्या.
टी-२० सामन्यांसह एकदिवसीय व अन्य प्रकारच्या क्रिकेटकडेही लक्ष द्यायला हवे. चांगले प्रायोजक मिळत नाही, तोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाहीत. औरंगाबादसारख्या ठिकाणी चांगले प्रायोजक मिळू लागले आहेत. त्यामुळे येथून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. शहरांपेक्षाही ग्रामीण भागात अधिक दर्जेदार खेळाडू असू शकतात. मी स्वत:च ग्रामीण भागातून आल्याने तसे माझे मत बनले असेल, असेही कपिल देव म्हणाले. अशा प्रकारच्या स्पर्धामुळे अन्य शहरांनाही प्रेरणा मिळू शकेल. येथील स्पर्धेचा निकाल काय लागला, याची निश्चित विचारपूस करेन, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी मुनीष शर्मा, शिरीष बोराळकर, सचिन मुळे, व्हेरॉकचे एन. पी. शर्मा आदींची उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
कपिलच्या शाब्दिक षटकारांनी चाहत्यांची तबियत खूश!
महान अष्टपैलू क्रिकेटपटू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचा माजी कर्णधार पद्मविभूषण कपिल देव यांनी शुक्रवारी औरंगाबादेत उतरल्यावर हाती बॅट न घेताच लीलया शाब्दिक चौकार नि षटकार लगावले! कपिलदेव यांच्या चाहत्यांना या चौकार-षटकारांनी मंत्रमुग्ध केले.
First published on: 05-01-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil speech makes his fans happy