शफी पठाण ग्रीष्माच्या ऐन होरपळीत ‘बालाघाटी’ पर्वतरांगांत तीन दिवसांच्या साहित्य संमेलनाचा घाट घालून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या ‘अचाट’ धाडसाचे दर्शन घडवले. आपल्या महामंडळीय प्रवासातील हे शेवटचे अवतारकार्य ‘ऐतिहासक’ वगैरे व्हावे, असा त्यांचा निग्रह असावा. पण या निग्रहामुळे संमेलनकर्त्यांच्या नाकीतोंडी आल्याचे या परिसरात फिरताना सतत जाणवत होते. कार्यालय प्रमुखांना ‘प्रमुख’ समस्या सोडवता सोडवत नव्हत्या अन् प्रसिद्धीप्रमुखांनी तर चक्क फोन बंद करून ‘स्वमुक्ती’चा सोपा मार्ग स्वीकारला होता. डोक्यावर जाळ धरणाऱ्या सूर्याच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी खुद्द महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाच उपरणे धारण करावे लागले. पण गुरुजींच्या आदेशाबरहुकूम हलणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ती सोयही नव्हती. ते बिचारे भर उन्हात मान्यवरांच्या स्वागताची रंगीत तालीम करीत होते. नाही म्हणायला आयोजकांनी वाटलेल्या दोन बोट आकाराच्या पाण्याच्या बाटल्या त्यांना तालमीचे बळ पुरवत होत्या. तिकडे दुपारचे दोन वाजले तरी ‘सोडत’ निघत नसल्याने प्रकाशकांच्या डोळय़ासमोर ‘अंधार’ दाटायला लागला होता. संमेलन काही तासांवर आले असतानाही शंभर टक्के काम झालेले नाही, या चिंतेने धावपळ करणारे स्वागताध्यक्ष मंत्रिमहोदय संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे कष्ट स्पष्ट जाणवत होते. त्यांच्या हाताखाली राबणाऱ्यांच्या मनात मात्र ती तळमळ काही केल्या जागृत होत नव्हती. त्यांच्या तळमळीला कदाचित ‘उदगिरी ऊन’ लागले असावे. तसाही हा संमेलनाचा नाही तर सावली शोधण्याचा काळ. चाळीसवर तापमानात काहिली पत्करून कोण कशी कविता वाचणार? पण महामंडळाच्या अध्यक्षांना या प्रश्नाने एका क्षणालाही विचलित केले नाही. त्यांनी उन्हातली वरात मांडवात आणलीच. जेव्हा केव्हा साहित्य संमेलनांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यांच्या या कौशल्याचे ‘कौतिक’ तर होणारच.