केबीसी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी तक्रारदारांची संख्या ५२५० वर जाऊन पोहोचली तर फसवणुकीची रक्कमही १४० कोटी रुपयांवर गेली आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण हे सिंगापूरमध्ये पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
अडीच ते तीन वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून केबीसीने राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात पैसे जमा केले. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हजारो नागरिकांचे हात पोळले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तक्रार देण्यासाठी गुंतवणूकदारांची एकच रिघ लागली. मंगळवापर्यंत आडगाव पोलीस ठाण्याकडे ५२५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम १४० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे पोलीस निरीक्षक अनील पवार यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात अटक झालेले केबीसीचे संचालक बापूसाहेब चव्हाण, दलाल पंकज शिंदे, नितीन शिंदे, नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण व पोलीस कर्मचारी संजय जगताप या सहा जणांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवापर्यंत वाढविण्यात आली. आरती चव्हाणची बहिण भारती शिलेदार व भावाची पत्नी कौसल्या जगताप यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ संशयितांना अटक झाली असली तरी मुख्य संशयितांपर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचू शकलेली नाही. तपास यंत्रणेने केलेल्या छाननीत भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण हे दोघे सिंगापूरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयातून पारपत्र मिळविल्यानंतर तीन दिवसात हे दोघे सिंगापूरला पळून गेले. सर्व संशयितांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने काही बँकांना पत्र पाठविले आहेत. त्यांची बँक खाती, लॉकरची माहिती देऊन त्या खात्यांवरील व्यवहार बंद करावेत, असे तपास यंत्रणेने सूचित केले आहे.