पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या समर्थक उमेदवारांच्या नावाच्या घोषणा देत येत होते. त्यामुळे मेळाव्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते शांत होत नाही हे बघून अजित पवारांनी माईकचा ताबा घेतला. “गप्प बसा… आता जर कोणी घोषणा दिली तर त्याला तिकिटच देणार नाही,” असा दम भरताच कार्यकर्ते शांत झाले.

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार उपस्थित होते. सर्व इच्छुक उमेदवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करत येत होते. पहिल्यांदा इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. त्यावर अजित पवार काहीच बोलले नाहीत. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठाशेजारी गर्दी केली. अखेर कार्यकर्त्यांना बाजूला थांबा अस माईक मध्ये सांगावं लागलं. तेवढ्यात, पुन्हा आणखी एक इच्छुक उमेदवार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांसह व्यासपीठाच्या दिशेने येत होता. सोबत अनेक कार्यकर्ते होते. तेव्हा, अजित पवार यांनी उठून माईकजवळ आले. “आता जर घोषणा दिली तर तिकीटच देणार नाही,” असा दम इच्छुक उमेदवारांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.