शहरासाठी टंचाई काळात  पाणीपुरवठा करण्यासाठी निर्माण झालेले खारआंबोली धरणाचे पाणी शहरात पिण्यासाठी उपलब्ध  झाल्याची माहिती नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी दिली. १९८२ पासून आंबोली लघु पाटबंधारे योजना प्रलंबित होती. गीता शेडगे नगराध्यक्ष व मंगेश दांडेकर उपनगराध्यक्ष असताना तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री बाळासाहेब थोरात शहरात आले असता पुन्हा या योजनेला गती मिळाली. अजितदादा पवार व आर. आर. पाटील  यांच्यासह त्यावेळी मंत्रालयात बैठका घेऊन मंत्रिमंडळाची पुनर्मान्यता घेऊन ही योजना मंगेश दांडेकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत गतिमान झाली. आणि शहरासाठी जीवनदायी ठरणाऱ्या या योजनेच्या कामाचे अंतिम टप्प्याच्या कळसाचे काम विद्यमान जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या सहकार्यामुळे सुलभ झाले.
धरणामधून  शहरात पाणी आणण्यासाठी ना. तटकरेंनी ११ कोटींचा निधी दिला आणि शहराच्या लोकवर्गणीचे १ कोटी १० लाख रुपयेसुद्धा वाचवले. या निधीमधून शहरांपर्यंत पाइपलाइन, जलशुद्धीकरण प्रकल्प, ओव्हरहेड टँक अशी कामे अंतिम टप्प्यात आहेत. याकामासाठी मंगेश दांडेकर यांच्यानंतर विद्यमान नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी सतत पाठपुरावा केला.
सध्या शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. या धर्तीवर नुकताच सुनील तटकरे यांचा दौरा मुरुडमध्ये संपन्न झाला. याचे औचित्य साधून शहराच्या अलकापुरीजवळील टाकीमध्ये धरणाचे पाणी सोडून शहरवासीयांना पाणी देण्याची सुरुवात झाली. तटकरे यांनीच या धरणाचे जलपूजन अर्थमंत्री असताना केले होते. त्यामुळे त्यांच्याच हस्ते पाणी वितरण करून तातडीने शहराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे नगराध्यक्ष कल्पना पाटील यांनी सांगितले.
नवीन योजनेमधील जलशुद्धीकरण केंद्र आणि इतर कामे पावसाळ्याअगोदर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या एकूणच योजनेचे भव्यदिव्य उद्घाटन त्यानंतरच केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी दिली.
नवीन धरणामधील पाणी नेहमीच्या पद्धतीने शुद्धीकरण प्रक्रिया करून नागरिकांना दिले जात आहे. त्यामुळे यावर्षीपासून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला, याबाबत नागरिक समाधानी आहेत.